Followers

Tuesday, September 2, 2025

भारत आणि स्वित्झर्लंडमधील सर्वांत मोठी ग्राहक सहकारी संस्था - किती ही तफावत!

किती ही तफावत!




स्वित्झर्लंडमधील श्विझ कॅन्टॉनमधील फ्रायनबाक गावात आमच्या नातेवाईकांकडे (मुलगी आणि जावई) आम्ही थांबलो  आहोत. (कॅन्टॉन म्हणजे घटक संघ राज्य. Constituent Federal State. स्वित्झर्लंड मध्ये २० पूर्ण कॅन्टॉन आणि ६ अर्ध-कॅन्टॉन आहेत. ). दररोज सकाळी फिरण्यासाठी म्हणून आम्ही फफिकॉन (श्विझ) या रेल्वे स्टेशनच्या परिसरात चालत जाऊन येतो.

 

एका दिवशी असेच फिरायला गेलो असता स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ एका खोक्यात वर्तमानपत्राचा गठ्ठा ठेवलेला असल्याचे दिसले. रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनमध्ये जाणारे बहुतेक प्रवासी खोक्यातील  वर्तमानपत्र घेऊन स्टेशनमध्ये प्रवेश करत होते. त्यांच्यापैकी एकाकडे चौकशी केली, तेव्हा ते वर्तमानपत्र मोफत असल्याचे कळलं. मग मीही  एक वर्तमानपत्र उचलले.


वर्तमानपत्राचे जर्मन भाषेतील नाव होते - 20 Minuten म्हणजे २० मिनिटे. प्रवाशांनी रेल्वेत चाळायला/वाचायला सुरुवात केल्यानंतर वर्तमानपत्र  वाचण्यास साधारणत: २० मिनिटे लागतील, म्हणून हे नाव!. स्वित्झर्लंडमधील सर्व रेल्वे स्टेशनमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हे वर्तमानपत्र मोफत वाचण्यासाठी ठेवण्यात येते.




टॅब्लॉइड आकाराचे हे वर्तमानपत्र एकूण ३२ पानांचे होते. इतर कोणत्याही वर्तमानपत्रात जशा असतात, तशाच बातम्या त्यात  होत्या. म्हणजे जागतिक घडामोडी, युरोपातील आणि विशेषतः युरोपातील बातम्या, स्वित्झर्लंड मधील त्यातही विशेषतः झुरिकप्रदेशातील उद्योग व्यावसाय, जन जीवन (Community and people), खाद्य पदार्थाच्या पाक कृती आणि खेळ; याशिवाय कार्टून, शब्दकोडे, इत्यादी विषयी मजकूर होता. (वर्तमानपत्र जर्मन भाषेत असले तरी Google Translate या App चा वापर करून बातम्या वाचण्याचा प्रयत्न करतो.)


 वर्तमानपात्राची पाने चाळत  असतांना एका शीर्षकाने  माझे लक्ष वेधून घेतले. एकूण ३२ पानांच्या या टॅब्लॉइड आकाराच्या वर्तमानपत्रात COOPZEITUNG WEEKLY या शीर्षकाखाली जाहिराती आणि लेख असणारी १६ पाने समाविष्ट केली होती. Google Translate च्या मदतीने zeitung शब्दाचा अर्थ शोधला. अर्थ होता 'वर्तमानपत्र'. नंतर Coop याबद्दल शोधाशोध केल्यावर कळले की, Coop ही स्वित्झर्लंड मधील एक सर्वात मोठी ग्राहक सहकारी संस्था आहे. आणखी खोलात जाऊन शोध घेतला तेव्हा अशी माहिती समोर आली.


कूप सायटुंग विकली हे स्वित्झर्लंडमध्ये सर्वात जास्त वाचले जाणारे साप्ताहिक वर्तमानपत्र आहे. (जर्मन भाषेत शब्दाच्या सुरुवातीला z हे अक्षर आले तर त्याचा स असा उच्चार करतात) तर 20 Minuten हे सर्वात जास्त वाचले जाणारे दैनिक वर्तमानपत्र आहे. Coopzeitung  हे साप्ताहिक स्विस  सहकारी संस्था, कूप (Coop) द्वारे प्रकाशित केले जाते. 



मुख्य आवृत्ती प्रत्येक गुरुवारी घरांपर्यंत आणि सुपरकार्ड (Supercard) ग्राहकांना वितरीत केली जाते. Coopzeitung Weekly ही एक विशेष पुरवणी (supplement) प्रत्येक सोमवारी विनामूल्य दैनिक वृत्तपत्र 20 Minuten मध्ये एक परिशिष्ट (insert) म्हणून प्रकाशित केली जाते. (Newspaper in Newspaper).  ही पुरवणी मुख्यतः जीवनशैलीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करते आणि तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केली गेली आहे.



मी सहकार क्षेत्रात २१ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली असल्याने Coop बद्दल माहिती मिळविण्याची मनात  जिज्ञासा जागी झाली आणि मी तिची माहिती गोळा केली. या संस्थेची १८६४ मध्ये स्थापना झाली. नंतर १८९० ते १८६९ या कालावधीत तिला अनेक सहकारी संस्था येउन मिळाल्या व या एकत्रित झालेल्या संस्थेस Coop, Switzerland असे नाव देण्यात आले.  २००१ मध्ये आणखी १४ प्रादेशिक सहकारी संस्था या Coop संस्थेला  मिळाल्या आणि आजच्या आधुनिक Coop  Group चा जन्म झाला.




Coop बद्दल माहिती गोळा करतांना तिचा भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक संस्थेशी तुलना करण्याचा मोह मला आवरता आला नाही. परिणामी, मी भारतातील सर्वात मोठी ग्राहक सहकारी संस्था असणाऱ्या केंद्रीय भांडार या ग्राहक सहकारी संस्थेशी तुलना केली आणि खालील तफावत समोर आली- 


वैशिष्ट्य

कूप (स्वित्झर्लंड)

केंद्रीय भांडार (भारत)

प्रमाण (Scale)

स्वित्झर्लंड आणि युरोपमधील सर्वात मोठ्या किरकोळ कंपन्यांपैकी एक.

एक महत्त्वपूर्ण ग्राहक सहकारी संस्था, पण खूपच लहान प्रमाणात कार्य करते.

व्यवसाय कार्यक्षेत्र

अत्यंत वैविध्यपूर्ण, ज्यात सुपरमार्केट, विशेष किरकोळ विक्री (इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू), रेस्टॉरंट्स, फार्मसी, घाऊक व्यापार आणि अन्न उत्पादन यांचा समावेश आहे.

मुख्यतः किराणा, घरगुती वस्तू आणि स्टेशनरीच्या किरकोळ विक्रीवर केंद्रित, विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करते.

ग्राहक 

स्वित्झर्लंडमधील सामान्य नागरिक, यात  २५ लाखांपेक्षा जास्त संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सर्व जनतेला सेवा देते.

प्रामुख्याने भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ती सामान्य जनतेलाही सेवा देते.

उलाढाल (Turnover)

२०२४ मध्ये CHF ३४.९ अब्ज (सुमारे ₹ ३.२ लाख कोटी).

२०२३-२४ मध्ये सुमारे ₹ ५,००० कोटी 

दुकानांची संख्या

स्वित्झर्लंडमध्ये २,६०० पेक्षा जास्त दुकाने.

सुमारे १५० दुकानांचे जाळे, जे मुख्यतः दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमध्ये आहेत.

सदस्यत्व मॉडेल

स्वित्झर्लंड किंवा लिक्टनस्टाइनमधील कोणताही रहिवासी कमी शुल्क भरून सदस्य होऊ शकतो, ज्यामुळे त्याला फायदे मिळतात, परंतु थेट मालकी किंवा मताधिकार मिळत नाही.

सदस्यत्व प्रामुख्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. ही एक बहु-राज्य सहकारी संस्था आहे.


काही लक्षणीय निरीक्षणे (Notable Observations)

Coop चे उद्दिष्ट तिच्या सदस्यांना (ग्राहकांना) दर्जेदार वस्तू आणि सेवा स्पर्धात्मक किमतीत प्रदान करणे आणि नफा व्यवसायात पुन्हा गुंतवणे हे आहे, ज्यामुळे किमती कमी राहतात आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होते तर केंद्रीय भांडारचे  उद्दिष्ट नफा वाढवण्याऐवजी परवडणाऱ्या वस्तू प्रदान करणे हे आहे. 


स्वित्झर्लंडची २०२४ मधील एकूण लोकसंख्या ९० लाख ३४ हजार आहे. यापैकी २५ लाख ९० हजार नागरिक Coop चे सभासद आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २९% पेक्षा जास्त  नागरिक  Coop चे सभासद आहेत. केन्द्रीय भांडार या संस्थेचे सदस्यत्व प्रामुख्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे सभासद संख्येवर कायद्यानेच मर्यादा येते. 


मुद्दा 

केंद्रीय भांडार (भारत)

कूप (स्वित्झर्लंड) 

दुकानांची संख्या

१५०

२६००

वार्षिक उलाढाल 

रू ३,१२३ कोटी 


(मार्च २०२३ अखेर)

रू २,८२,००० कोटी 


(डिसेंबर २०२२ अखेर)

वार्षिक नफा

रु. ५.०५  कोटी 

(मार्च २०२३ अखेर)

रु. ४६३६ कोटी 

(डिसेंबर २०२२ अखेर)


Coop ची दुकाने केंद्रीय भांडारच्या दुकानांच्या १७ पटीपेक्षा जास्त  आहेत! 

Coop ची उलाढाल केंद्रीय भांडारच्या उलाढालीच्या ९० पटीपेक्षा जास्त  आहे!

Coop चा नफा केंद्रीय भांडारच्या नफ्याच्या ९१८ पटीपेक्षा जास्त  आहे!


आता वळू या भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या भौगोलिक क्षेत्रफळाकडे, लोकसंख्येकडे आणि दरडोई उत्पन्नाकडे -


मुद्दा

भारत

स्वित्झर्लंड 

क्षेत्रफळ (चौ.  किमी)

३२,८७,२६३

४१,२९५

लोकसंख्या

१४४ कोटी 

१ कोटीपेक्षा कमी

(९०,३४०००)

दरडोई उत्पन्न (२०२५ मध्ये)  रु

          २ लाख ४० हजार

८७ लाख 


भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ३२,८७,२६३ वर्ग किमी  आणि स्वित्झर्लंडचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ४१,२९५ वर्ग किमी. 

भारताची लोकसंख्या आहे १४४ कोटी आणि स्वित्झर्लंडची लोकसंख्या आहे ९०,३४०००. 


भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ स्वित्झर्लंडच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या ८० पट आहे,

भारताची लोकसंख्या स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येच्या  १५९ पट आहे! 

आणि स्वित्झर्लंडचे दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या ३६ पटीपेक्षा जास्त आहे!


(Coop चे हिशेब वर्ष ‘जानेवारी ते डिसेंबर’ असे असते तर केंद्रीय भांडारचे  हिशेब वर्ष ‘एप्रिल  ते मार्च’  असे असते. त्यामुळे उलाढाल व नफा या आकडेवारीचा उल्लेख  करतांना Coop साठी जानेवारी ते डिसेंबर २०२२ व केंद्रीय भांडारसाठी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ असे कालावधी विचारात घेतले आहेत, ज्यामुळे ही  तुलना जास्तीत जास्त तर्कशुद्ध व न्यायसंगत  होईल.)