उत्तर कोरियात आणि पाकिस्तानात हुकूमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते राज्य करतात. या दोन्ही देशांतील राज्यकर्त्यांचा कळसूत्री बाहुल्यांसारखा वापर करण्याचे धोरण चिनी राज्यकर्ते राबवित आले आहेत. पाकिस्तानचा वापर भारताविरुद्ध आणि उत्तर कोरियाचा वापर जपानविरुद्ध! पण उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आता चीनलाही न जुमानता आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करतांना ही क्षेपणास्त्रे जपानच्या अवकाशातून आरपार डागली आणि आता चीनचे डोळे खाडकन उघडले! उद्या पाकिस्तानातील राज्यकर्तेही उत्तर कोरियाच्या हुकूमशहासारखे वागतील, याची चिनी राज्यकर्त्यांना जाणीव झाली आणि म्हणूनच चीनने ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेतली. (चीनची ही 180 अंशाच्या कोनातून बदललेली भूमिका म्हणजे भक्तांना त्यांच्या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिपाक वाटणे, हे त्यांच्या अंधभक्तीला साजेसेच आहे.) पण उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची भांडखोर व युद्धखोर खुमखुमी भारतासाठी इष्टापत्ती ठरली, ही आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे.