Followers

Monday, April 18, 2022

ऑथेल्लोची शोकांतिका (The Tragedy of Othello by William Shakespeare)

ब्रिटिश साम्राज्य आणि शेक्सपियर यातील एक गोष्ट सोडा, असे जर कुणी इंग्लिश माणसाला म्हटले, तर तो साम्राज्य सोडण्यास राजी होईल, पण शेक्सपिअर सोडणार नाही- थॉमस कार्लाइल, सुप्रसिद्ध इतिहासकार व निबंधकार.


शेक्सपिअरचे विश्व हे असंख्य अनुभवांचे विश्व. माणसांना येणाऱ्या नानाविध अनुभवांना त्याच्या नाटकांतून वाचा फुटली आहे. - पु.  ल. देशपांडे


शेक्सपिअर म्हणजे शब्द सृष्टीचा  लीलालाघवी ईश्वर! - वि. स. खांडेकर

-------------------------------------------------------------------------------------------------------

ऑथेल्लो

नाटककार - विल्यम शेक्सपिअर

स्रोत: सिंथियोच्या Un capitano Moro (A Moorish Captain) या  लघुकथेवर आधारित. सन १५६५. 

लेखन  : इ. स. १६०३/४

प्रकार - शोकांतिका 

स्थळ - व्हेनिस आणि सायप्रस 

    पत्नी व्यभिचारी असण्याच्या संशयाने पछाडलेल्या  शूर आफ्रिकन सेनापतीची ही शोकांतिका आहे. प्रेम, द्वेष,

मत्सर, फसवणूक, सूड  आणि विश्वासघात हे यातील मुख्य विषय (Themes) आहेत. 


पात्र परिचय 

ऑथेल्लो - नाटकाचा मुख्य नायक, व्हेनिसच्या सैन्यदलाचा  सेनापती, जन्माने आफ्रिकन कृष्णवर्णीय. 

डेस्डेमोना - नाटकाची नायिका, ब्रॅबँशियो याची श्वेतवर्णीय मुलगी व ऑथेल्लोची पत्नी. 

ब्रॅबँशियो - डेस्डेमोनाचा पिता, व्हेनिस येथील प्रतिष्ठित सिनेटर. 

इयागो - ऑथेल्लोच्या हाताखालील अधिकारी/कोतवाल आणि खलनायक.  

एमिलिया - इयागोची पत्नी आणि डेस्डेमोनाची सेविका.   

कॅशियो - ऑथेल्लोच्या हाताखाली काम करणारा तरुण, देखणा पण कमी अनुभवी सैनिक, याला ऑथेल्लो उपसेनापतीचा हुद्दा देतो. 

रोडरिगो- डेस्डेमोनावर एकतर्फी प्रेम करणारा तरुण. श्रीमंत पण मूर्ख. 

बियांका - एक वेश्या, कॅशियो हिचा  ग्राहक आहे, पण तो तिला लग्नाचे खोटेच आश्वासन देऊन झुलवीत असतो.  

ड्यूक ऑफ व्हेनिस - व्हेनिसचा सरदार.  

मॉन्टानो - सायप्रसचा गव्हर्नर 

लोडोविको  - ब्रॅबँशियोचा नातेवाईक. 

ग्रेझियानो -  ब्रॅबँशियोचा नातेवाईक.

विदूषक 

ऑथेल्लो - नाट्यकथा सारांश 

 

अंक पहिला 

ब्रॅबँशियो हा व्हेनिसमधील एक श्रीमंत सिनेटर आहे. त्याची मुलगी डेस्डेमोना ही सुशील, सद्गुणी  आणि सुंदर आहे. साहजिकच अनेक तरुणांना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. पण तिने मात्र वयाने तिच्यापेक्षा बराच मोठ्या  असणाऱ्या एका वयस्कर कृष्णवर्णीय आफ्रिकन शूर सैनिकाशी गुपचूप पळून जाऊन लग्न केले आहे.  हा सैनिक म्हणजे ऑथेल्लो. डेस्डेमोनाच्या वडिलांना म्हणजेच ब्रॅबँशियो याला  तो आवडायचा आणि त्यामुळे ब्रॅबँशियो ऑथेल्लोला नेहमी घरी बोलावीत असे.


ऑथेल्लो हा एक साहसी सैनिक असल्याने व त्याने व्हेनिसच्या शत्रू असलेल्या तुर्कांविरुद्धच्या लढायांमध्ये शौर्य गाजविले असल्यामुळे  त्याला आता व्हेनिसच्या सेनापतीचे पद देण्यात आले आहे. 

  ब्रॅबँशियोच्या घरी आल्यावर त्याच्या आग्रहावरून ऑथेल्लो त्याच्या भूतकाळातील आफ्रिकेतील अनोळखी प्रदेशातील संकटांच्या, लढायांच्या, शत्रूच्या तावडीतील तुरुंगवासाच्या, गुलामगिरीच्या आणि सुटकेच्या चित्तथरारक घटनांचे  वृत्तांत सांगत असे. हे वृत्तांत ऐकतांना डेस्डेमोना तल्लीन होत असे. ऑथेल्लोला सहन कराव्या लागलेल्या त्रासाच्या आणि संकटांच्या कथा ऐकतांना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असत. 

एकदा ऑथेल्लोसोबत ती एकटीच असतांना तिने त्याचा पूर्ण जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. तो जीवन वृत्तांत ऐकल्यावर ती त्याला  म्हणाली, “देवाने माझ्यासाठी असाच पुरुष पाठवावा. माझ्यावर प्रेम करणारा तुमचा एखादा मित्र असेल तर त्याला तुमची कथा सांगण्याची कला शिकवा. तो नक्कीच माझं हृदय जिंकेल. ”

यातला गर्भितार्थ ऑथेल्लो समजून घेतो आणि तोही त्याची प्रेम भावना तिच्यासमोर व्यक्त करतो. 

हे सांगतांना ऑथेल्लो म्हणतो,

Upon this hint I spake.

She loved me for the dangers I had passed,

And I loved her that she did pity them. 


आपल्या सुंदर आणि उच्चकुलीन मुलीने एका वयस्कर कृष्णवर्णीय सैनिकाशी लग्न केलेले डेस्डेमोनाच्या प्रतिष्ठित सिनेटर वडिलांना आवडणार नाही, याची जाणीव  ऑथेल्लो आणि डेस्डेमोना या दोघांनाही असल्याने त्यांनी पळून जाऊन गुप्तपणे लग्न केले आहे.


या गुप्त लग्नाची बातमी डेस्डेमोनाचे वडील ब्रॅबँशियोच्या कानावर जाते आणि तो व्हेनिसच्या ड्यूकसमोर ऑथेल्लोविरुद्ध खटला दाखल करतो. ऑथेल्लोने काहीतरी जादूटोणा करून भोळ्या भाबड्या डेस्डेमोनाला फूस लावून लग्न केले आहे व यासाठी माझी संमती नाही, असा आरोप तो ऑथेल्लोवर ठेवतो.


आपली बाजू मांडतांना ऑथेल्लो ड्यूकसमोर ब्रॅबँशियोच्या घरी घडलेल्या सर्व घटनांचे  वर्णन करतो आणि  सांगतो, “माझ्या भूतकाळातील रोमांचकारी प्रसंगांचे वृत्तांत ऐकून डेस्डेमोना आसवे ढाळीत असे. माझी चित्तथरारक जीवन कथा ऐकून तिने माझ्यावर प्रेम केले आणि तिने मला जी सहानुभूती दाखविली, त्यामुळे मी तिच्यावर प्रेम केले आहे. हाच तो जादूटोणा !”


ऑथेल्लोची जीवन कथा ऐकून ड्यूक म्हणतो, “I think this tale would win my daughter too. [ही कथा ऐकून माझी मुलगीही (ऑथेल्लोच्या) प्रेमात पडली असती!]


या लग्नाला ब्रॅबँशियोने मान्यता द्यावी, असा सल्ला ड्यूक देतो, परंतु यावर डेस्डेमोनाचे काय म्हणणे आहे ते ऐकावे, तिची या लग्नाला संमती असेल, तर या लग्नाला मीही मान्यता देईन, असे  सुचवितो. डेस्डेमोनाला तिथे बोलाविले जाते आणि तिचे म्हणणे तिने मांडावे, असे सांगितले जाते. त्यावर वडिलांनी तिला जन्म दिल्याबद्दल आणि चांगले शिक्षण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डेस्डेमोना म्हणते. 


“I am hitherto your daughter. But here’s my husband.

And so much duty as my mother showed

To you, preferring you before her father,

So much I challenge that I may profess

Due to the Moor my lord.”


“आतापर्यंत मी तुमची मुलगी होते, आता मी यांची पत्नी आहे. माझ्या आईने कर्तव्यनिष्ठा (तिच्या वडिलांच्या ऐवजी) जशी तुमच्या चरणी वाहिली आहे, तशीच मी आता माझी कर्तव्यनिष्ठा ऑथेल्लोच्या चरणी वाहत आहे. “


अत्यंत अनिच्छेने ब्रॅबँशियो या लग्नाला मान्यता देतो आणि डेस्डेमोनासारख्या अजून एखाद्या  मुलीला त्याने जन्म दिला नाही, याबद्दल समाधान व्यक्त करतो. पण तिथून निघुन जाण्यापूर्वी ब्रॅबँशियो ऑथेल्लोला एक सूचक इशारा देतो, 


“Look to her, Moor, if thou hast eyes to see.

She has deceived her father, and may thee.”

“तिने तिच्या बापाला फसविले आहे, ती तुलाही फसवील. तिच्यावर बारीक लक्ष ठेव!”


ड्यूकने ज्या  कामासाठी ऑथेल्लोला दरबारात बोलाविले असते, ते काम म्हणजे तुर्कांचा सायप्रसवरील संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी ऑथेल्लोकडे युद्धात नेतृत्त्व करण्याची जबाबदारी देणे. हे काम ऑथेल्लो आनंदाने स्वीकारतो.

 

सायप्रसला जातांना डेस्डेमोनालाही सोबत नेण्याची परवानगी तो ड्यूककडून मिळवितो. डेस्डेमोनाला सायप्रसला घेऊन येण्याचे काम त्याचा विश्वासू सहायक अधिकारी  इयागो  याच्याकडे सोपवितो. 


इयागो हा ऑथेल्लोला आपला शत्रू मानतो. एमिलिया ही इयागोची पत्नी आहे. ऑथेल्लोचे त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच एमिलियासोबत अनैतिक संबंध असावेत, असा संशय इयागोच्या मनात असतो. ऑथेल्लोसोबत शत्रुत्त्व करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे उपसेनापतिपदी ऑथेल्लोने इयागोची नेमणूक न करता कॅशियोची नेमणूक केली, हे आहे. असे असले तरी तो ऑथेल्लोसोबत बोलतांना वरकरणी तो टोकाचा  स्वामीनिष्ठ असल्याचे ढोंग करतो. 

 

डेस्डेमोनाशी लग्न करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या व्हेनिसमधलं एक श्रीमंत आणि उच्चकुलीन तरुण रोडेरिगो याच्याशी बोलतांना इयागो आपल्या ढोंगी वागण्याचे वर्णन करतांना म्हणतो,

In following him, I follow but myself.

Heaven is my judge, not I for love and duty,

But seeming so, for my peculiar end.

I am not what I am.


“मी माझे हेतू सिद्धीस नेण्यासाठी त्या कुरूप ऑथेल्लोची चाकरी करीत आहे. हे फक्त ईश्वरालाच माहित आहे कि, त्याच्याबद्दल मला प्रेमही नाही आणि स्वामीनिष्ठा तर मुळीच नाही.  मी जसा दिसतो, तसा नाही.” 


रोडेरिगो आणि डेस्डेमोना यांचे प्रेमसंबंध जुळवून देण्यासाठी इयागोने  रोडेरिगोकडून भरपूर द्रव्य आणि मौल्यवान वस्तू घेतल्या आहेत आणि भविष्यातही घेणार आहे. डेस्डेमोनाचे प्रेम  प्राप्त करून घेण्यासाठी रोडेरीगोने वेषांतर करून सायप्रसला यावे, असे तो सुचवितो. (डेस्डेमोना आणि ऑथेल्लोच्या गुप्त लग्नाची बातमी इयागोनेच रोडेरीगोमार्फत ब्रॅबँशियोकडे पोचविलेली असते.) 


उपसेनापतिपदी ऑथेल्लोने इयागोची नेमणूक न करता कॅशियोची नेमणूक केली, ही  गोष्ट इयागोला अत्यंत अपमानास्पद वाटते. इयागो हा अनुभवी आणि वयस्कर सैनिक आहे, तर कॅशियो हा अननुभवी तरुण “कारकून” आहे. कॅशियो देखणा आणि खेळकर स्वभावाचा आहे. त्याचेही एमिलियासोबत अनैतिक संबंध असावेत, असा संशय इयागोच्या मनात आहे.


ऑथेल्लो आणि कॅशियो या दोघांनाही अद्दल घडविण्यासाठी इयागो अत्यंत भयंकर कारस्थान रचतो आणि पुढील खरे नाट्य सुरु होते.