Followers

Tuesday, July 14, 2020

परकीय भाषांतील कलाकृती मराठी व हिंदी भाषांत

परकीय भाषांतील कलाकृती मराठी व हिंदी भाषांत
    
    मित्रांनो, परकीय भाषेत अनेक उत्कृष्ट अशा कलाकृती आहेत. परंतु त्या आपणास  माहित नसल्यामुळे आपण त्यांचा आस्वाद  घेण्यापासून वंचित राहतो. काही बाबतीत परकीय भाषा आपणांस अवगत नसल्याने, तर कधी या कलाकृतींमध्ये बऱ्याच शतकांपूर्वीची भाषा असल्यामुळे ( उदा. शेक्सपियरची  १६ व्या आणि १७ व्या शतकातील इंग्रजी ) असे होते. यांपैकी अनेक कलाकृती भारतीय भाषांमध्ये भाषांतरित किंवा थोड्या फार फरकाने adapt केलेल्या आहेत. मला माहित असलेल्या कलाकृतींची यादी खाली देत आहे. त्यांचा आपण अवश्य आस्वाद घ्या. आपणांस याशिवाय आणखी काही परकीय भाषांतील कलाकृती भारतीय भाषांत विशेषतः मराठी किंवा हिंदीत  भाषांतरित किंवा adapt केल्याचे माहित असेल तर अशा कलाकृतींची यादी अवश्य share करा.

१.  Othello (शेक्सपियरचे नाटक) 
    ओमकारा (हिन्दी चित्रपट Adaptaion)    
    निष्पाप (प्रा. दिलिप परदेशी लिखित मराठी नाटक Adaption)
    ऑथेल्लो (वि. वा. शिरवाडकर लिखित मराठी भाषांतर)


२. King Lear (शेक्सपियरचे नाटक) -                                                      
   राजा लिअर ( विंदा करंदीकर लिखित मराठीभाषांतर) 
    नटसम्राट (वि. वा. शिरवाडकर लिखित मराठी नाटक Adaptaion)

३. Comedy of Errors (शेक्सपियरचे नाटक) 
    अंगूर (हिन्दी चित्रपट Adaptaion)

४. Hamlet (शेक्सपियरचे नाटक) - 
   हैदर (हिन्दी चित्रपट Adaptaion)

५. Pygmalion ( जाॅर्ज बर्नार्ड शाॅ चे नाटक) - 
    फुलराणी (पु. ल. देशपांडे लिखित मराठी नाटक Adaptation)

५. The Blue Angel (जर्मन चित्रपट) 
    पिंजरा ( मराठी चित्रपट Adaption)

६. Macbeth (शेक्सपियरचे नाटक)  
    मकबूल (हिंदी चित्रपट Adaptaion)

७. Romeo and Juliet (शेक्सपियरचे नाटक) 
    राम लीला (हिंदी चित्रपट Adaptation))

८. The Goverment Inspector (रशियन नाटककार निकोलाय गोगोल यांचे नाटक) 
    अंमलदार (पु. ल. देशपांडे यांचे मराठी नाटक)

९. The Tempest (शेक्सपियरचे नाटक)
     द टेम्पेस्ट (परशुराम देशपांडे लिखित मराठी भाषांतर)

१०. The Guide (आर के. नारायण यांची इंग्रजी कादंबरी)
     गाईड (हिंदी चित्रपट)

११. Suzanna's Seven Husbands (रस्किन बॉण्ड यांची लघुकथा आणि कादंबरी)
      7 खून माफ (हिंदी चित्रपट Adaptation)

१२. Umar Khayyam's Rubayat (एडवर्ड फिटजेराल्ड यांनी केलेले इंग्रजी भाषांतर)
    रुबाइयात उमर खय्याम (मैथिलीशरण गुप्त यांनी केलेले हिंदी भाषांतर)
    उमर खय्यामकी मधुशाला (हरिवंशराय बच्चनयांनी केलेले हिंदी भाषांतर)
    उमर खय्यामच्या रुबाया  (माधव ज्युलियन यांनी  केलेलेमराठी भाषांतर)
१३. An Ideal Husband (Oscar Wilde यांचे नाटक)- दूरचे दिवे (वि. वा. शिरवाडकर यांचे नाटक)

Sunday, July 12, 2020

पर्शियन कवी उमर खय्यामची सर्वात प्रसिद्ध रुबाया (चारोळी)

पर्शियन कवी उमर खय्यामची सर्वात प्रसिद्ध रुबाया (चारोळी)

              
                    
पर्शियन कवी उमर खय्यामची सर्वात प्रसिद्ध रुबाया (चारोळी)

        मी १०-१२  वर्षांचा असतांना (१९७५-७७ या काळात) आमच्या गावाकडील घराच्या अडगळीत एक कवितांचे पुस्तक मला सापडले होते. पुस्तकांवर नाव होते "उमर खय्यामच्या रुबाया" आणि  कवीचे नाव होते- माधव जुलियन. (बहुदा माझ्या दिवंगत काकांनी हे पुस्तक विकत आणले असावे.) बालपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे मी त्या कविता वाचू लागलो. सर्व कवितांमध्ये दारूची महती गायिल्याचे पाहून मला आश्चर्य आणि गंमत वाटली. तिरस्करणीय पेय असलेल्या दारूवर कविता रचण्यात येतात व त्यांचे छापील पुस्तकही निघते, हे मला विचित्र वाटले होते. 

         मागील २०१९ मधील उन्हाळ्यात मला Edward FitzGerald यांनी इंग्रजीत काव्यात्मक भाषांतर केलेल्या  खय्यामच्या रुबाया (चारोळ्या) वाचायला मिळाल्या. लगोलग मैथिलीशरण गुप्त आणि हरिवंशराय बच्चन यांनी या रुबायांचे हिंदीत केलेले  काव्यात्मक भावानुवाद वाचायला मिळाले. आणि एक खजिना हाती लागल्याचा आनंद झाला! त्यानंतर अनेक दिवस मी खय्याममय झालो होतो. 

       या  पर्शियन कवीच्या रुबायांचे इंग्रजीत Edward FitzGerald (३१ मार्च १८०९ ते १४ जून १८८३) यांनी काव्यात्मक भाषांतर केले असून जगातील रसिकांमध्ये हे इंग्रजी भाषांतरच जास्त प्रसिद्ध आहे.

       उमर खय्याम ( इ. स. १८ मे  १०४८ ते ४ डिसेंबर १८३१) यांचा जन्म ईशान्य इराणमध्ये खोरासान प्रांतात निशापू(बु)र येथे झाला. ते गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि पर्शियन कवी होते.
   
        उमर खय्याम यांच्या रुबायांची जगाला ओळख झाली ती इंग्रजी कवी Edward FitzGerald यांनी खय्यामच्या रुबायांचे इंग्रजीत काव्यात्मक भाषांतर केल्यावर! विशेष म्हणजे यानंतरच खय्याम यांची महती  इराणमधील लोकांना कळली. Edward FitzGerald यांनाही रुबायांमुळेच कीर्ती प्राप्त झाली. सन १८५९ ते १८७९ या कालावधीत त्यांनी भाषांतराच्या एकूण ५ आवृत्त्या काढल्या व भावानुवादात योग्य असे बदलही केले.

        तत्पूर्वी Thomas Hyde यांनी सर्वप्रथम सन १७०० मध्ये एका रुबाईचे लॅटिनमध्ये भाषांतर केले होते. त्यानंतर Joseph von Hammer - Purgstall यांनी १८१८ मध्ये खय्यामच्या काही कवितांचे जर्मन भाषेत भाषांतर केले होते.  सन १८४६ मध्ये Gore Ouseley यांनी इंग्रजीत भाषांतर केले होते. तरीही खय्यामचे काव्य जगासाठी अज्ञातच राहिले होते.  पण १८५९ मध्ये Edward FitzGerald यांनी इंग्रजीत भाषांतर केल्यावर खय्याम जगाला माहित झाले.

       वर उल्लेख केल्याप्रमाणे माधव जुलियन (२१ जानेवारी १८९४ ते २९ नोव्हेंबर १९३९) यांनी रुबाया मराठीत आणले. या सुप्रसिद्व  मराठी कवीचे पूर्ण नाव आहे माधव त्रिंबक पटवर्धन. माधव जुलियन हे त्यांचे टोपण नाव. त्यांनी जुलियन हे नाव का घेतले, याबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जात. (प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! या सुप्रसिद्ध कवितेचे हे कवी आहेत.) फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक असणाऱ्या या माधव जुलियन यांनी फारसी भाषेतील गझल व रुबाई हे काव्यप्रकार  मराठीत सर्वप्रथम आणले. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होत. या मंडळात इतरही अनेक सदस्य कवी असले तरी "या मंडळात माधव जुलियन हे रवी आहेत तर बाकी सगळे कवी किरणे आहेत!", असे म्हटले जायचे. त्यांनी रुबायांचे केलेले भाषांतरचे पुस्तक कुणाकडे उपलब्ध असेल तर मराठी रसिकांसाठी ती मेजवानी ठरेल.
       
         युरोपीय रसिकांमध्ये या रुबाया इतक्या लोकप्रिय आहेत कि, तेथे रुबायांचा आस्वाद घेण्यासाठी खय्याम यांच्या नावाने अनेक Club स्थापन झाले आहेत.

         रुबायात (Ruba iyat) म्हणजे चार ओळी. 

          आपले जीवन अल्पायुषी असून या आयुष्यात आपण सर्व प्रकारच्या आनंदाचा भरपूर उपभोग घेतला पाहिजे. रुबायांतील मद्यालय हे आयुष्याचे/जीवनाचे प्रतीक आहे, तर मद्य हे आनंदाचे प्रतीक आहे.  आयुष्यरूपी मद्यालयात आनंदरुपी  मद्य  भरपूर प्राशन  पाहिजे,  असे  रुबायांमधील मध्यवर्ती सूत्र आहे. खय्याम नेहमीच ऐहिक सुखाचा जोरदार पुरस्कार करतो.

       उमर खय्यामची सर्वात प्रसिद्ध रुबाया (चारोळी) 
 
   या रुबायाचा उल्लेख पु. ल. देशपांडे यांच्या "सुंदर मी होणार" या नाटकात आहे. या नाटकातील कविमनाची नायिका हेमलता या रुबाया  वाचत असते. नाटकातील डॉक्टर काकांना हे पुस्तक तिच्या खोलीतील टेबलवर दिसते आणि ते हे पुस्तक उचलून त्यातील ही  इंग्रजीतील रुबाई वाचून दाखवतात. त्यानंतर कवी संजय या रुबाईचा मराठीतील अर्थ सांगतात. ती रुबाई अशी आहे:


A Book of Verses underneath the Bough,
A Jug of wine, a Loaf of Bread - and Thou
Beside me singing in the Wilderness-
Oh, Wilderness were the Paradise enow !
(Edward FitzGerald यांनी केलेले भाषांतर)

इस तरू तले कहीं खानेको रोटी का टूकडा हो एक,
पीनेको मधु-पात्र पूर्ण हो, करनेको हो काव्य विवेक,
तिस पर इस सन्नाटमें तुम बैठ बगल में गाती हो,
ता नंदन सम इस विजन में मुझे स्वर्ग का हो अभिषेक!
(मैथिलीशरण गुप्त यांनी केलेले भाषांतर)

घनी सिर पर तरुवर की डाल, हरी पावों के नीचे घास,
बगल में मधु मदिरा का पात्र, सामने रोटी के दो  ग्रास,
सरस कविता की पुस्तक हाथ, और सब के उपर तुम प्राण,
गा रही छेड सुरीली तान, मुझे अब मधु नंदन उद्यान!
                                         (हरिवंशराय बच्चन यांनी केलेले भाषांतर)

या ओळींचे मला जमेल तसा, मी केलेला मोडकातोडका भावानुवाद खालीलप्रमाणे :

"वनदेवीच्या मायेत, गर्द तरुच्या छायेत,
एका हाती काव्यफुले, दुज्या हाती मधुप्याला,
भाजी भाकरी ताटात; अन गुणगुणते मधुबाला,
हवे आणखी काय मला? स्वर्ग भूवरी अवतरला!"
सुधीर मेत्रेवार