Followers

Saturday, August 16, 2025

अबब! ७३८ रुपयांचे वर्तमानपत्र!

 अबब! ७३८ रुपयांचे वर्तमानपत्र!

      मुलगी आणि जावई यांच्या प्रेमळ आग्रहावरून आम्ही ११ ऑगस्ट २०२५ रोजी बंगळूर येथून निघालो आणि अबुधाबी इथे मध्यरात्रीनंतर २ तासांचा स्वल्प विराम घेऊन १२ ऑगस्ट रोजी सकाळी झुरिक विमानतळावर उतरलो. आम्हाला घेण्यास आमचे प्रेमळ नातवाईक आले आणि विमानतळाला लागूनच असलेल्या तळमजल्यावरील रेल्वे स्टेशनहून निघालेल्या रेल्वेने तिथून ३१ किमी अंतरावर असलेल्या फॅफिकोन या गावी पोचलो. तिथून बस घेऊन १ किमी अंतरावरील सारेनबाख इथे आलो. (रेल्वे आणि बसच्या एकूण प्रवासासाठी एकच सामाईक तिकीट होते. ३२ किमी अंतरासाठी एका तिकिटासाठी त्यांनी १७.५० स्विस फ्रँक्स म्हणजे फक्त रु १९०० मोजले! 1 स्विस फ्रँक = 108.56 रु) तिथून पायी २ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या भाड्याच्या घरी पोचलो. 

      मागील दोन दिवस घरासभोवतालचा परिसर पाहिला आणि आज म्हणजे १४ ऑगस्ट रोजी (टी शर्ट, हाफ पँट व कॅप या वेशभूषेत) फॅफिकोन रेल्वे स्टेशनच्या दिशेने पदयात्रा सुरू केली. जातांना अनेक आबालवृद्ध सायकल स्वार भेटले. यातील बरेच जण स्विमिंग कॉस्च्युम घेऊन जवळच्याच जगप्रसिद्ध झुरिक लेकमध्ये पोहण्यास चालले होते, तर काही जण कायाक घेऊन कायाकिंग करण्यासाठी लेकच्या दिशेने निघाले होते. (सारेनबाख हे गाव झुरिक लेकच्या काठावर वसले आहे.) जवळपास सर्वांनीच जर्मन भाषेत (Wie geht's) “काय चाललं आहे?” अशा आशयाचे अभिवादन केले. आम्ही “हालो” अशा जर्मन उच्चाराने प्रतिसाद दिला.

    जातांना रस्त्यात एका डेअरीमध्ये जाऊन गुबगुबीत गाई आणि वासरांचे दर्शन झाले. प्रेमळ वासरे जरा जास्तच सलगी दाखवित होती. इथल्या सौजन्यशील नागरिकांचा सहवास त्यांना रोजच लाभत असल्यामुळे वासरांवरही सुसंस्कार झाले असणारच! तिथल्या एकाने एका भल्या मोठ्या भांड्यातून पाईपद्वारे दूध एका बॅकेटमध्ये ओतले. मग आम्ही सोबत नेलेल्या बाटलीत १ लिटर दूध ओतले. मी त्याच्यासमोर, माझ्याकडे असलेली सर्व स्विस नाणी धरली. त्याने त्यातून एक लीटर दुधासाठी १ फ्रँक घेतले. दोन दिवसांखाली इथल्या स्थानिक सुपर मार्केट मधून एक लिटर बाटलीबंद दूध (भाव १.४५ स्विस फ्रँक) आणले होते. तीच रिकामी बाटली आज सोबत नेली होती. रेल्वे तिकिटाच्या मानाने दूध स्वस्त असल्याचे दिसून आले.


त्या नंतर फॅफिकोन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. तिथून ५ मिनिटांच्या अंतरावर स्टेशन होते. स्वच्छ आणि सुंदर रस्ते, सुटसुटीत फुटपाथ, चकचकीत गाड्या, दुकाने, जिकडे पाहावे तिकडे हिरवीगार झाडे आणि मनमोहक पुष्परचना दृष्टीस पडत होत्या. 

जेव्हा आम्ही रस्ता ओलांडण्यास सुरुवात करत असू, तेव्हा गाड्यांचे चालक गाड्या थांबवून आमचा सन्मान करीत होते. जगात सर्व देशांमध्ये पायी चालणाऱ्यांना प्राधान्य देण्याचे नियम आहेत, पण स्वित्झर्लंडमध्ये या नियमाचे आनंदाने काटेकोरपणे पालन केले जाते.



     रेल्वे स्टेशनच्या परिसरात थोडा वेळ फिरल्यानंतर एका दुकानासमोर वर्तमानपत्रे लावून ठेवलेली दिसली. मी त्यातील Financial Times उचलला आणि कॅश काउंटरवर जाऊन माझ्याकडील नाणी काउंटरवरील महिलेसमोर धरली. तिने ती सर्व नाणी मोजून घेतली व इंग्रजीत म्हणाली, “Thank you”. मी जर्मन व इंग्रजी अशा खिचडी भाषेत Danke, Madam” असे उत्तर दिले.

      तिथून पायी चालत घरी येईपर्यंत घामाघूम झालो होतो. सध्या इथे अत्यंत कडक ( इथल्या दृष्टीने) उन्हाळा चालू आहे. आजचे इथले किमान व कमाल तापमान १९ व ३२ डिग्री सेल्सिअस होते. आपल्याकडच्या मानाने हा उन्हाळा सौम्यच म्हटला पाहिजे.

   घरी आल्यावर उतावीळपानाने वर्तमानपत्र उघडले आणि किंमत पहिली. किंमत होती ६.८ स्विस फ्रँक्स म्हणजे जवळपास ७३८ रुपये! याच वर्तमान पत्राची भारतातील किंमत २२० रुपये असल्याचेही इथेच कळले! वर्तमानपत्र खरेदी करून आपण मुलीच्या पैशांची उधळपट्टी केली, अशी अपराध भावना मनात घर करून राहू लागली.


       वर्तमानपत्र चाळले असता त्यात अत्यंत माहितीपूर्ण लेख असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे आज त्यात ट्रम्प tariff चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम या विषयावर एक आणि भारतातील उच्च शिक्षित अभियंत्याच्या Braindrain या विषयावरवर एक, असे दोन लेख होते.

      पहिल्या लेखाचे शीर्षक होते, Tariffs threaten Modi’s ‘Make in India’ ambition लेखक होते क्रिस के आणि कृष्ण कौशिक, मुंबई. प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात भारतीय लेखकाचे नाव पाहून बरे वाटले. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर ५०% tariff लावल्यामुळे भारतातल्या तयार कपडे, दागिने, ऑटोमोबाइल्स, कार्पेट, सी फूड, अशा उद्योगांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा आढावा घेतला आहे. यामुळे Make in India ही मोहीम संकटात सापडली आहे, असा निष्कर्ष लेखात काढण्यात आला आहे.


           दुसऱ्या लेखाचे शीर्षक आहे Why can't India build an Nvidia or a DeepSeek? लेखक आहेत हेन्री सेंडर. भारतातील उच्च शिक्षित व कुशल अभियंते अमेरिका आणि इतर विकसित देशात जाऊन Nvidia सारखी कंपनी उभारण्यात उल्लेखनीय कामगिरी करतात, पण भारतात ते ही कामगिरी का करू शकत नाहीत, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे. भारतीय कंपन्या या व्यापारी किंवा वितरक (traders and distributors) आहेत, परंतु त्या innovation कडे सातत्याने दुर्लक्ष करत आल्या आहेत. तसेच भारत सरकारही होतकरू नव उद्योजकांना (Startups) पुरेसे आर्थिक पाठबळ देत नाही. भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे एक सदस्य नीलकांत मिश्रा (२० वर्षांपूर्वी ते भारतातील एका प्रतिष्ठित IIT मधून पदवी धारण केलेले) यांचे उदाहरण दिले आहे. मिश्रा यांच्या वर्गातील Computer Science या विषयातील पहिल्या ३० विद्यार्थ्यांपैकी २६ जण परदेशात राहतात, आणि आता ते अमेरिकेचे नागरिक आहेत. ते निवृत्त झाले तरीही भारतात येणार नाहीत. बंगळूर किंवा हैदराबाद येथे येण्याऐवजी ते अमेरिकेतच अजून एक Nvidia ची उभारणी करतील.

    याशिवाय या वर्तमानपत्रात ट्रम्प-पुतिन बैठक आणि त्यामुळे झेलेंस्की यांची झालेली केविलवाणी अवस्था, ट्रम्प tariff चे जागतिक गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम, इस्रायलच्या पंतप्रधान आणि सेनाध्यक्ष यांच्यातील मतभेद, अशा विषयांवरील अनेक माहितपूर्ण लेख आहेत.

      हे सर्व लेख वाचल्यानंतर हे वर्तमानपत्र खरेदी करून आपण काही फार मोठी चूक केली नाही, असे वाटून माझी अपराधीपणाची भावना बऱ्याच प्रमाणात कमी झाली!

14 comments:

  1. खूपच सुंदर 👍

    ReplyDelete
  2. Khup Chan article लिहले आहे असेच लिहित रहा नक्कीच आम्हाला v वाचक म्हणून माहीत होईल की दुसर्‍या देशात आणि भारत देशात कसे काय फरक आहे

    ReplyDelete
  3. छान 👌👌

    ReplyDelete
  4. 👌👌👍🌹🙏

    ReplyDelete
  5. Shabdon ka uchit prayog Kiya

    ReplyDelete
  6. आम्हालाही स्वित्झर्लंड मधे वावरत असल्याचा फील आला वाचताना

    ReplyDelete
  7. अतिशय छान लेख. असंच लिखाण करत राहा म्हणजे आम्हालाही आपल्या आनंदात सहभागी होता येईल.

    ReplyDelete
  8. आकलन आणि विवेचन याचा उत्कृष्ट सांगड

    ReplyDelete
  9. Very nice metrewar saheb I feel like I am in Switzerland Torludwar

    ReplyDelete
  10. खूप छान लेख सुधीर..

    ReplyDelete
  11. As vatl ki Kontya tri pustakache lekh vachat age

    ReplyDelete
  12. सर्वांना मनापासून धन्यवाद!

    ReplyDelete