ताळेबंद म्हणजे काय?
कोणत्याही व्यवसायात स्वतःच्या मालकीचा निधी (स्वनिधि) आणि गरज पडल्यास कर्ज (देयता) घेऊन व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक मालमत्ता खरेदी करण्यात येते. म्हणून मालमत्ता म्हणजे देयता अधिक स्वनिधी. हेच ताळेबंदाचे सूत्र (Balance Sheet Equation) आहे. ताळेबंद समजून घेण्यासाठी हे सूत्र उपयुक्त अत्यंत आहे.
स्वनिधीला नक्त मूल्य (Net worth किंवा Owners' Equity) असेही म्हटले जाते. हे सूत्र Asset=Net worth+Liabilities असेही मांडता येते. स्वनिधीमध्ये भागभांडवल, मुक्त निधी आणि संचित नफ्याचा समावेश होतो.
स्वनिधी, देयता आणि मालमत्ता (Owners' Equity, Liabilities and Assets) हे ताळेबंदाचे तीन मुख्य घटक आहेत. यापैकी कोणत्याही घटकात बदल झाला तर संस्थेच्या आर्थिक स्थितीत बदल होतो. परिणामी, ताळेबंदात बदल होतो. संस्थेत दररोज असंख्य आर्थिक व्यवहार (financial transactions) अव्याहतपणे होतात. प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा वरील तीन घटकांपैकी एका घटकावर परिणाम होतोच. खर्चात किंवा उत्पन्नात बदल झाला की नफा/तोटा बदलून स्वनिधीत बदल होतो. येणे रकमेत बदल झाला की, मालमत्तेत (assets) बदल होतो. देणे रकमेत बदल झाला की देयता (liabilities) मध्ये बदल होतो. अशा प्रकारे प्रत्येक आर्थिक व्यवहारामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीत बदल होत असतो. त्यामुळे ताळेबंद हा संस्थेच्या या आर्थिक स्थितीचे त्या विशिष्ट क्षणाचे (at a specific point in time) क्षणचित्र (snapshot) असतो.
आपण जेव्हा 31 मार्च रोजीचा ताळेबंद म्हणतो तेव्हा 31 मार्च रोजी शेवटचा आर्थिक व्यवहार झाला त्या क्षणाचा तो ताळेबंद असतो. त्या दिवशी सकाळचा ताळेबंद वेगळा असतो, दुपारचा वेगळा असू शकतो. संस्थेच्या आर्थिक वाटचालीची आपण एखाद्या प्रवासी बससोबत तुलना केली तर ताळेबंद म्हणजे अशा बसचा कोणत्याही क्षणी (गतिमान स्थितीतला आणि थांबलेल्या अवस्थेतही) फोटो आहे!
No comments:
Post a Comment